काही वेळां भगवंतापेक्षा संत जवळचे वाटतात - कारण असे की आपल्यापैकीच एक - पण वरच्या पायरीवर पोंचलेला तो संत असे मनांत येते! आणि असे मानले तर ते फारसे चुकीचेही नसते. जन्मतः संत अपवादमात्रच. खरे पाहतां सामान्यांचेच संत होतात व तेहि दीर्घ वाटचालीनंतर.
'खांचखळगे मातले तस्करांनी वेढिले' अशीच संतांच्या मार्गाचीही अवस्था असते. संतांनाही पायपीट करावी लागते. मोहाने त्यांचेही पतन होते. पश्चात्तापाने तेसुद्धा पोळून निघतात. मग त्यांना वैराग्याची आंस लागते. भक्तीची भूक जाणवते, कांहीतरी मिळाले असे वाटेपर्यंत आपण गमावलेच जास्त अशी खंतही हृदयाला घरे पाडू लागते! तरीही जो धैर्याने साधना चालू ठेवतो त्याला गुरु लाभतो. निष्ठेने गुरुसेवा केली की योग्य मार्ग दिसतो. अखेर बोध आणि साक्षात्कार होतो - प्रत्यक्ष वा मनोमय समाधीपर्यंत संत पोंचतात!
सुदैवाने महाराष्ट्रांत अनेक संतांनी आपल्या वाटचालीचा तपशील इमानदारीने, तपशीलवार आणि आवाहकतेने नोंदून ठेवला आहे - आपल्याला मार्गदर्शक म्हणून. सोन्यांत सुगंध असा की यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम आहे संगीताचे.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, दामोदरपंडित, चोखा मेळा, एकनाथ, रामदास, निळोबा, अमृतराय, देवनाथ, विठ्ठल बीडकर, जनाबाई, वेणाबाई मध्वमुनीश्वर, महीपतिबुवा, नामदेव, तुकाराम इत्यादींच्या पारदर्शक रचना संतांच्या संगीतमय वाटचालीची साक्ष देतात. रचनांसाठी योजलेल्या चौपदी, पद, विराणी, अभंग, वासुदेव, भारुड व कथनकाव्य इत्यादी संगीतप्रकारांतून निवड करून ही वाटचाल आपल्या समोर ठेवण्याची मनीषा आहे!
|