महाकाव्ये म्हणजे संस्कृतीचे समग्र उद्गार होत. भारतांत दोन महाकाव्ये देशवासियांच्या मनाला आकार देत राहिली आहेत. जगांत किती संस्कृतींत रामायण महाभारतासारखी दोन महाकाव्ये असतील? भारताचे मर्म समजून सांगण्यास एक महाकाव्य पुरे पडले नाही काय ! ते कांहीहि असो, संस्कृतीच्या गाभ्याशी महाकाव्यांइतके दुसरे कांही क्वचितच भिडते. रामकथेचे यश हे कीं दर पिढी रामाला नव्याने समजून घेण्याचा वसा घेते. खरे म्हणजे स्वतःला समजून घेण्याच्या मोहिमेचाच हा एक भाग असतो.
एकाच वेळी महानायक, महामानव, दैवत व अवतार इतक्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या रामाचे दर्शन घडविण्याचा यत्न भारतांत व भारताबाहेर अनेक शास्त्रांनी व कलांनी केला आहे . भारतीय संगीतच याला अपवाद कसे असेल? संगीताने रामकथा तर टिपली पण त्याचबरोबर व्यक्तींचे भावरूप, प्रसंगांभोवतालचे भावनांचे जाळेही वेधक पद्धतीने समोर आणले. म्हणूनच एकाच वेळी कथा, कथेचा तत्त्वार्थ, प्रसंगाचे तात्पर्य आणि भावनिक आशय यांनी रामाचे संगीत आपल्याला आवाहन करते.
संत, संगीतकार व कवि यांनी आपआपला राम गाण्यांतून उभा केला. रामदास, मणिराम, रघुनाथ पंडित, कृष्णंभट, एका-जनार्दन, विठ्ठल बिडकर, वामन पंडित, सुरतसेन, बैजू बावरा, कबीर, रसिक संप्रदायी कवि आणि अनामिक पण या गीतयात्रेंत सामील होते. यांच्या नामावलि, धृपद, ख्याल, लावणी, भजन, पद, ओवी, ठुमरी इ. अनेक गीतप्रकारांतून, २२ रचनांच्या सहाय्याने उघड्या डोळ्यांनी, अधीर कानांनी, आणि सहृदय रसिकांच्या साक्षीने रामाचा शोध घेणारा हा कार्यक्रम !
|