देवता उत्सवाने मोठी होत नाही- ती मुळांत महत्त्वाची वाटते म्हणून तिचे उत्सव होऊ लागतात. श्री गणेशाचे असेच झाले आहे. विविध कालखंडांत, वेगवेगळ्या स्थानी आणि निरनिराळ्या कारणांसाठी भारतीय समाजाला या देवतेचे श्रेष्ठत्व कमीअधिक तीव्रतेने जाणवू लागले. अशाप्रकारे अनेकांच्या अनुभवातून कोणतीही देवता ताऊन सुलाखून निघाली की गीत-वाद्य-नृत्य यांची कलात्मता नाट्याच्या बहुकोणांतून देवतेकडे न्याहाळून पाहू लागते.
श्री गणेशाचे उदाहरण इथेही वेधक आहे. बीजमंत्र, धृपद, ख्याल, ठुमरी, लावणी, भारुड, पद, अभंग, नामावलि इ. प्रकारांच्या सहाय्याने संगीतकलेने गणेशाकडे आदराने पाहिले. इब्राहीम आदिलशाह ( द्वितीय) तानसेन, बैजू, बख्सू, तुकाराम, रामदास, अमृतराय, रंगनाथस्वामी, शाहीर परशुराम, गंगू हैबती, मध्वमुनीश्वर, पठ्ठे बापूराव आणि अनेक अनामिकांनी देवतेच्या आकर्षक रुपगुणाचे तरंग सर्वांच्या मनांत तरळत राहावेत म्हणून आपले कौशल्य पणाला लावले आहे.
|