 |
|
 |
|
सकलांचे सोयरे
|
काही वेळां भगवंतापेक्षा संत जवळचे वाटतात - कारण असे की आपल्यापैकीच एक - पण वरच्या पायरीवर पोंचलेला तो संत असे मनांत येते! आणि असे मानले तर ते फारसे चुकीचेही नसते. जन्मतः संत अपवादमात्रच. खरे पाहतां सामान्यांचेच संत होतात व तेहि दीर्घ वाटचालीनंतर.
'खांचखळगे मातले तस्करांनी वेढिले' अशीच संतांच्या मार्गाचीही अवस्था असते. संतांनाही पायपीट करावी लागते. मोहाने त्यांचेही पतन होते. पश्चात्तापाने तेसुद्धा पोळून निघतात. मग त्यांना वैराग्याची आंस लागते. भक्तीची भूक जाणवते, कांहीतरी मिळाले असे वाटेपर्यंत आपण गमावलेच जास्त अशी खंतही हृदयाला घरे पाडू लागते! तरीही जो धैर्याने साधना चालू ठेवतो त्याला गुरु लाभतो. निष्ठेने गुरुसेवा केली की योग्य मार्ग दिसतो. अखेर बोध आणि साक्षात्कार होतो - प्रत्यक्ष वा मनोमय समाधीपर्यंत संत पोंचतात!
सुदैवाने महाराष्ट्रांत अनेक संतांनी आपल्या वाटचालीचा तपशील इमानदारीने, तपशीलवार आणि आवाहकतेने नोंदून ठेवला आहे - आपल्याला मार्गदर्शक म्हणून. सोन्यांत सुगंध असा की यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम आहे संगीताचे.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, दामोदरपंडित, चोखा मेळा, एकनाथ, रामदास, निळोबा, अमृतराय, देवनाथ, विठ्ठल बीडकर, जनाबाई, वेणाबाई मध्वमुनीश्वर, महीपतिबुवा, नामदेव, तुकाराम इत्यादींच्या पारदर्शक रचना संतांच्या संगीतमय वाटचालीची साक्ष देतात. रचनांसाठी योजलेल्या चौपदी, पद, विराणी, अभंग, वासुदेव, भारुड व कथनकाव्य इत्यादी संगीतप्रकारांतून निवड करून ही वाटचाल आपल्या समोर ठेवण्याची मनीषा आहे!
|
Photos
|
|
बैठकीची लावणी
|
महाराष्ट्राची लावणी हा सर्वार्थाने संगीतातला एक स्वतंत्र प्रकारच म्हणावा लागेल. काही वेळा चुकीने लावणीला लोकसंगीत म्हटले जाते. पण संगीत, काव्य, नाट्य व नृत्य अशा विविध कलांचा संगम साधणारी ती लावणी. ह्याचबरोबर लावणीमध्ये सतत दिसणारे सामाजिक भान हे तिच्या लोकप्रियतेचे लक्षण असावे.
गण, गवळण, ढोलकीची लावणी, बैठकीची लावणी, भेदिक लावणी, अशा विविध प्रकारात लावणी सादर होते. ह्या प्रत्येक अविष्काराला स्वतःचे असे एक स्वतंत्र सांगीत वैशिष्ट्य आहे. आज मात्र यातले काही प्रकार अस्तंगत होत चालले आहेत. तथापी महाराष्ट्र संस्कृतीची ज्यांना नीट ओळख करून घ्यायची असेल त्यांना मात्र लावणी अशी सर्वार्थाने समजणे आवश्यक आहे.
डॉ. अशोक रानडे ह्यांनी आपल्या व्यासंगी संशोधनातून अशा लावण्यांना सादर करण्याचे योजिले आहे . ह्यामध्ये संत जनाबाई, होनाजी बाळा, राम जोशी, संत परशुराम, पठ्ठे बापूराव, संत माणीकप्रभू, देवनाथ, सय्यद अहमद अशा अनेक गुणवंतांच्या लावण्या निवडण्यात आल्या आहेत.
|
Photos
|
|
रामगाणे
|
महाकाव्ये म्हणजे संस्कृतीचे समग्र उद्गार होत. भारतांत दोन महाकाव्ये देशवासियांच्या मनाला आकार देत राहिली आहेत. जगांत किती संस्कृतींत रामायण महाभारतासारखी दोन महाकाव्ये असतील? भारताचे मर्म समजून सांगण्यास एक महाकाव्य पुरे पडले नाही काय ! ते कांहीहि असो, संस्कृतीच्या गाभ्याशी महाकाव्यांइतके दुसरे कांही क्वचितच भिडते. रामकथेचे यश हे कीं दर पिढी रामाला नव्याने समजून घेण्याचा वसा घेते. खरे म्हणजे स्वतःला समजून घेण्याच्या मोहिमेचाच हा एक भाग असतो.
एकाच वेळी महानायक, महामानव, दैवत व अवतार इतक्या जबाबदाऱ्या पेलणाऱ्या रामाचे दर्शन घडविण्याचा यत्न भारतांत व भारताबाहेर अनेक शास्त्रांनी व कलांनी केला आहे . भारतीय संगीतच याला अपवाद कसे असेल? संगीताने रामकथा तर टिपली पण त्याचबरोबर व्यक्तींचे भावरूप, प्रसंगांभोवतालचे भावनांचे जाळेही वेधक पद्धतीने समोर आणले. म्हणूनच एकाच वेळी कथा, कथेचा तत्त्वार्थ, प्रसंगाचे तात्पर्य आणि भावनिक आशय यांनी रामाचे संगीत आपल्याला आवाहन करते.
संत, संगीतकार व कवि यांनी आपआपला राम गाण्यांतून उभा केला. रामदास, मणिराम, रघुनाथ पंडित, कृष्णंभट, एका-जनार्दन, विठ्ठल बिडकर, वामन पंडित, सुरतसेन, बैजू बावरा, कबीर, रसिक संप्रदायी कवि आणि अनामिक पण या गीतयात्रेंत सामील होते. यांच्या नामावलि, धृपद, ख्याल, लावणी, भजन, पद, ओवी, ठुमरी इ. अनेक गीतप्रकारांतून, २२ रचनांच्या सहाय्याने उघड्या डोळ्यांनी, अधीर कानांनी, आणि सहृदय रसिकांच्या साक्षीने रामाचा शोध घेणारा हा कार्यक्रम !
|
Photos
|
|
Under Construction
Under Construction. Please visit again.
कला गणेश
|
देवता उत्सवाने मोठी होत नाही- ती मुळांत महत्त्वाची वाटते म्हणून तिचे उत्सव होऊ लागतात. श्री गणेशाचे असेच झाले आहे. विविध कालखंडांत, वेगवेगळ्या स्थानी आणि निरनिराळ्या कारणांसाठी भारतीय समाजाला या देवतेचे श्रेष्ठत्व कमीअधिक तीव्रतेने जाणवू लागले. अशाप्रकारे अनेकांच्या अनुभवातून कोणतीही देवता ताऊन सुलाखून निघाली की गीत-वाद्य-नृत्य यांची कलात्मता नाट्याच्या बहुकोणांतून देवतेकडे न्याहाळून पाहू लागते.
श्री गणेशाचे उदाहरण इथेही वेधक आहे. बीजमंत्र, धृपद, ख्याल, ठुमरी, लावणी, भारुड, पद, अभंग, नामावलि इ. प्रकारांच्या सहाय्याने संगीतकलेने गणेशाकडे आदराने पाहिले. इब्राहीम आदिलशाह ( द्वितीय) तानसेन, बैजू, बख्सू, तुकाराम, रामदास, अमृतराय, रंगनाथस्वामी, शाहीर परशुराम, गंगू हैबती, मध्वमुनीश्वर, पठ्ठे बापूराव आणि अनेक अनामिकांनी देवतेच्या आकर्षक रुपगुणाचे तरंग सर्वांच्या मनांत तरळत राहावेत म्हणून आपले कौशल्य पणाला लावले आहे.
|
Photos
|
|
|
|
 |
|
 |
|
|
|
|